Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांनी या मोहिमेबाबत मोठे संकेत दिल्याने नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला आहे. “एकनाथ शिंदे योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्याच दिवशी हे ऑपरेशन पूर्ण होईल,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्याला माजी खासदार निलेश राणे यांनीही दुजोरा दिला. “ऑपरेशन टायगरबाबत जे बोलले जात आहे, तेच होणार आहे,” असे सांगत त्यांनी शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू असल्याचा दावा केला.
यावेळी निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधला. मातोश्रीवरील बैठका, खासदारांची अनुपस्थिती आणि पक्षातील अस्वस्थता यांचा उल्लेख करत त्यांनी ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले. शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि एकनाथ शिंदे यांची कार्यशैली यामुळे अनेक जण पक्षाकडे आकर्षित होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’ नेमके कोणाविरोधात आणि कोणत्या स्वरूपात राबवले जाणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आता सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदे कोणता ‘मुहूर्त’ निवडतात, याकडे लागले आहे.


