Pune News : केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांच्या बेकायदा गर्भलिंग निदानासाठी पशुवैद्यकीय तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नरेंद्र साहेबराव ठाकरे याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले असून तपासाला वेग आला आहे.
पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचा अलीकडेच पर्दाफाश करण्यात आला होता. या रॅकेटमार्फत गावोगावी जाऊन महिलांची बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात होती. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, या गैरप्रकारासाठी जनावरांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करण्यात येत होता. या मशीनचा पुरवठा नरेंद्र ठाकरे याच्याकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात यापूर्वी अण्णासाहेब गिरी, नरेंद्र ठाकरे आणि डॉ. अतुल अंकुश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. मुलींच्या जन्मदरावर परिणाम करणाऱ्या अशा बेकायदा कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.


