FDA Maharashtra : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. 13 ते 15 जून 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या धडक मोहिमेत तब्बल 2 कोटी 11 लाख 87 हजार 123 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 16 जणांना अटक, 4 आस्थापना सील आणि 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात ही मोहीम राबविण्यात आली. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
राज्यभरातील 15 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 14 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. या कारवाईत 83 लाख 41 हजार 821 रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागात सर्वाधिक 70.92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला, तर नागपूर विभागात 7.25 लाख रुपयांचा साठा जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली.
दरम्यान, चंद्रपूरमध्ये गुटखा विक्री प्रकरणात पाच जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
याशिवाय ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या मोहिमेअंतर्गत निकृष्ट, भेसळयुक्त आणि संशयित अन्नपदार्थांवरही कारवाई करण्यात आली. राज्यातील 10 आस्थापनांवर छापे टाकून 1 कोटी 28 लाख 45 हजार 302 रुपयांचा 51 हजार किलोहून अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत सुपारी, खाद्यतेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढे, तूप, गूळ, पिण्याचे पाणी, आंबा तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश आहे. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे विभागात सर्वाधिक 1.17 कोटी रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, राज्यभरातील या मोहिमेमुळे भेसळखोर आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.


