Deool Band 2 Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी चित्रपटांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. देऊळ बंद 2 आणि राजा शिवाजी या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले असून, दोन्ही चित्रपटांच्या यशामुळे मराठी सिनेसृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे.
21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 30 दिवस पूर्ण झाले असतानाही त्याची लोकप्रियता कायम असून प्रेक्षकांचा ओघ अजूनही सुरू आहे.
पाचव्या शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या 30 व्या दिवशी चित्रपटाचे राज्यभरात 521 शो पार पडले. या दिवशी चित्रपटाने सुमारे 25 लाख रुपयांची कमाई केली. त्याआधी 29 व्या दिवशी चित्रपटाने 35 लाख रुपयांचे कलेक्शन नोंदवले होते. त्यामुळे दिवसागणिक कमाईत किंचित घट दिसत असली तरी चित्रपटाची पकड अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘देऊळ बंद 2’ने आतापर्यंत भारतात तब्बल 70.22 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अवघ्या एका महिन्यात हा टप्पा गाठल्याने चित्रपट आता 80 कोटींच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘राजा शिवाजी’च्या यशानंतर आता ‘देऊळ बंद 2’ किती मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांतील प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि वीकेंडची कमाई यावर चित्रपटाच्या पुढील प्रवासाचे गणित अवलंबून असणार आहे.
याचबरोबर तुंबाडची मंजुळा या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 12.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.


