बदलापूर : मी अंगावर घेतले तर पूर्णपणे घेतो, कसली फिकीर करत नाही. त्यामुळे मला अजून बंगला मिळाला नाही, लय अन्याय होतोय माझ्यावर, अशी खंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२५ वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वसतिगृहे उभारण्याच्या कामासाठी १,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून राज्याच्या सर्व तालुक्यांत वसतिगृहे उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात वसतिगृह उभारले जाणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


