सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गांवर असलेल्या आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बस चालकाला झोप लागल्याने बस खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ३० प्रवाशी जखमी झाले असून यामधील २० जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लातूर येथून खासगी बस (एमएच ४८ के १९१८) ही बुधवारी (दि. ४) रात्री उशिरा पुण्याकडे निघाली होती. ही बस सोलापूर-पुणे महामार्गावरील आढेगाव शिवारात आली असता अचानक पलटी झाली. त्यामुळे परिसरात मोठा आवाज झाला. त्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या इतर गाड्यांच्या चालकांनी व परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत केली. या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


