नाशिक: काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाशिक शहरातील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश अखेर आज (दि. १७) मुंबईत पार पडला. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नायना घोलप, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह इतर माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर म्हणाले की,”पक्षाचे वरिष्ठ मला जो आदेश देतील, त्या पद्धतीने मी काम करेल. त्यांच्या आदेशांचे मी पालन करेल”, असे त्यांनी म्हटले आहे. तर माजी मंत्री बबन घोलप म्हणाले की,”सुधाकर बडगुजर यांचा अपमान झाला म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षात वरिष्ठांचा मानसन्मान राखला जात नाही”, असे देखील त्यांनी म्हटले.


