मुंबई: भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्याविरोधात त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी आपल्या दोन मुलांसह विधानभवनाबाहेर आंदोलनासाठी पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना दोन्ही मुलांसह ताब्यात घेतले.
प्रिया फुके म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भेट द्यावी. मी वर्षभरापासून वेळ मागतेय; पण ते भेटत नाहीयेत. परिणय फुकेसारख्या व्यक्तीला ते कशासाठी सेफ करत आहेत, हे मला कळत नाही. आमच्यावर जे काही होतेय, त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा.’ प्रिया फुके यांनी यापूर्वीदेखील परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत सांगितले होते की, ‘माझे आणि संकेत फुके यांचे लग्न २०१२ साली फसवणूक करून लावण्यात आले.
लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच त्यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते, हे सत्य माझ्यापासून लपवले गेले.’ हा प्रकार उघड होताच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संकेत फुके यांचे २०२२ मध्ये निधन झाल्यानंतर प्रिया फुके यांचे हाल अधिकच वाढले. मानसिक व शारीरिक त्रास, मुलाच्या कस्टडीसाठी दबाव तसेच अत्याचारासाठी लोकांना पाठवण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला.


