पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाचा दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांमध्ये माजी सभापती आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन आणि रामकृष्ण सातव हे तीव्र इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार की चुरशीची, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
२५ महिन्यांपूर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर सभापतिपदी काळभोर यांची निवड झाली. त्यानंतर सव्वा वर्षाच्या कालावधीत अविश्वास ठराव दाखल केला होता. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. तर, वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांनी बाजार समिती विषयी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
तर २०२३ मध्ये तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही संचालक मंडळाच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. ती चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी सभापतींवर एकदा अविश्वासाचा ठरावही आणण्यात आला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला आहे. बाजार समितीवर २० वर्षे प्रशासक होते. त्यानंतर २५ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यानंतर संचालक मंडळ आले. तेव्हापासून काळभोर सभापती होते. बाजार समितीवर विजयी झालेले संचालक मंडळ राष्ट्रवादी, भाजपसह विविध पक्षाने स्थानिक आमदार आणि संमिश्र आहे.


