मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा प्रकर्षाने विधानसभेत मांडा. जेणेकरून तो विषय पटलावर येईल आणि सरकारला उत्तर देणे भाग पडेल, या अनुषंगाने चर्चा करा, अशा सूचना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना सोमवारी दिल्याचे समजते. शिवसेनेने (ठाकरे) अधिवेशनाच्या दुसरा आठवड्याच्या पहिल्या दिवशी सर्व आमदारांची विधानभवनांत बैठक घेतली. परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठक पार पडली. आमदारांच्या कामगिरीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचे घोंगडे भिजत पडले आहे. महाविकास आघाडीकडे अपुरे संख्याबळ आहे. विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली. विधानसभा अध्यक्षांना पत्रव्यवहार केला. परंतु, अध्यक्षांकडून अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आमदारांसोबत चर्चा केली.
ते म्हणाले की, अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत चर्चा होते, परंतु सभागृहात याबद्दल प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत, असा सवाल ठाकरेंनी सर्व आमदारांना विचारला. तसेच आत्तापर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन पत्रव्यपहार केला. परंतु, आता थेट सभागृहातच आवाज उठवा अध्यक्षांना पायऱ्यांवर जाब विचारा. जेणेकरून हा विषय पटलावर येऊन अध्यक्षांना निर्णय घेणे भाग पडेल.
पायऱ्यांवर आंदोलन; मोजके आमदार
बहुमतामुळे सताधारी विरोधकांना सभागृहात जुमानत नाहीत. कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करतात. सभागृहाऐवजी बाहेर पायऱ्यांवर आवाज उठवा. सगळे आमदार यावेळी उपस्थित राहत नाहीत, अशी बाब ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी नाराजी व्यक्त करत आक्रमक विशेषतः अपेक्षित पद्धतीने आंदोलन करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.


