सोलापूर: सन २०२४ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आपत्तींसाठी २,३२,८५१ शेतकऱ्यांकरता रुपये २७८.७१ कोटी रक्कम नुकसानभरपाई म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी नैसर्गिक आपत्ती व इतर आपत्ती यासाठी १,५९,६९९ अर्जदार शेतकऱ्यांना एकूण रुपये १९७ कोटी ६३ लाख इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. विमा कंपन्यांना अनुदान अनुदान मिळताच त्यांची विम्याची रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू होईल, असेही राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, मान्सूनपूर्व पावसामुळे सांगली जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील २०२४ च्या खरीप हंगामातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
ती कधी मिळणार आणि पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी आणि आठ दिवसांत निपटारा व्हावा. तसेच विम्याबावत शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी एक टोल फ्री क्रमांक देण्यात यावा. कारण प्रत्येक विमा कंपन्यांचे स्वतंत्र निवारण केंद्र आहे. पण ते एकाच संकेतस्थळावर आले पाहिजे. एका कंपनीने काय मोबदला दिला ते दुसऱ्या कंपनीच्या शेतकऱ्यालाही कळले पाहिजे. यासाठी सर्वच विमा कंपन्यांना एकाच संकेतस्थळावर घ्यावे, अशी मागणी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यासाठी २७८.७१ कोटी नुकसानभरपाई निश्चित झालेली आहे. त्यापैकी १९७कोटी ६३ लाख इतकी पहिली नुकसानभरपाई दिलेली आहे.


