वॉशिंग्टन : बलाढ्य रशियाने गेल्या आठवडाभरापासून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेन काहीसा पिछाडीवर पडला असतानाच आता या देशाला अमेरिकेचे बळ मिळणार आहे. आम्ही युक्रेनला आणखी शस्त्र पुरवठा करणार आहोत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्पष्ट केले. युक्रेनचा शस्त्र पुरवठा रोखण्यासंबंधित आदेश जारी केल्याच्या काही दिवसांतच ट्रम्प यांनी यूटर्न घेतला आहे.
रशिया व युक्रेन युद्धाला जवळपास ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही दोन्ही देशांमध्ये समेट घडलेला नाही. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे हात बळकट करण्याचा पवित्रा घेतला आहे. व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेनला शस्त्र पुरवठा करीत नवी ताकद देणे गरजेचे आहे. आम्हाला असे पाऊल उचलावेच लागेल. युक्रेनला स्वरक्षण करण्यात सक्षम करावेच लागेल. चिरस्थायी शांतता स्थापन करणे व हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले.
युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याच्या वृत्ताची अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागनने पुष्टी केली. डोनाल्ड ट्रम्प हे जगभरात सैन्यविषयक सामग्री पुरवठा करण्याची समीक्षा करीत आहेत. हा ‘अमेरिका प्रथम’ संरक्षण धोरणाचा भाग आहे, असे पेंटागनचे प्रवक्ते सीन पारनेलने यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब अशी की, युक्रेनला हवाई हल्ल्यांपासून वाचवणारी क्षेपणास्त्रे, अचूक निशाणा साधणाऱ्या तोफांसारखे शस्त्र पुरवण्यास स्थगिती देण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतला होता. अमेरिकेकडील शस्त्रसाठा अतिशय कमी झाला असल्यामुळे ट्रम्प चिंतित असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आता त्यांनीच युक्रेनला आणखी शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, रशियाने युक्रेनवर गतरात्री जोरदार हवाई हल्ले केले. यात किमान ११ जण मरण पावले असून ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी आठवडाभरापासून रशियाने युक्रेनवर जवळपास १२७० ड्रोन, ३९ क्षेपणास्त्र आणि जवळपास १००० शक्तिशाली ग्लाइड बॉम्बचा मारा केला आहे.


