पुणे: पुणे, खडकी कटक मंडळाचे (कॅण्टोन्मेंट बोर्ड) पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटक मंडळाचे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये, देवळाली व अहमदनगर कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिका, तर कामठी कटक मंडळ येरखेडा नगरपंचायतीमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. या कटक मंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांत समावेश झाल्याने नागरी सुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधान भवन येथे राज्यातील कॅण्टोन्मेंट बोर्डाचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलीनीकरणाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, व्हीसीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, ‘पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
डीपीसीमधून निधी देणार : अजित पवार
पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहमदनगर या कटक मंडळाचा समावेश झाल्याने जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून या परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाईल. संबंधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.


