टोरंटो: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, हल्लेखोर कारमध्ये बसून नऊ गोळ्या झाडताना दिसतो. हल्ल्यावेळी परिसरात अंधार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीतसिंग लड्डी याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
हरजीत हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतील आहे. तो बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेशी संबंधित आहे. कपिलच्या कॉमेडी शोमधील एका जुन्या वक्तव्यावरून त्याने हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. कपिलने अलीकडेच ७ जुलैला कॅनडाच्या सरे नामक भागात ‘कॅप्स कॅफे’ नामक हे कॅफे सुरू केले आहे. पीच रंगाच्या थीमवर या कॅफेची सजावट करण्यात आली आहे.


