मुंबई : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्या दृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे दिले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी वाघमारे यांनी हे निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यी पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी.
त्याचबरोबर उपलब्ध मतदान यंत्रांचा अचूक आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही पुढे वाघमारे यांनी दिल्या. तर मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी तातडीने हाती घेण्यात यावी व ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावीत, असे निर्देश यावेळी काकाणी यांनी दिले.


