केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील आंबेगाव पुनर्वसन येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूळ डोक्यात मारून खून झाल्याची भयानक घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेंगावडे आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू होते. या वेळी पल्लवी हिने आपल्या हातातील त्रिशूळाने नितीन याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा त्रिशूळ नितीन याने चुकवल्याने तो शेजारी भावजयीच्या कडेवर असणाऱ्या अकरा महिन्याच्या बालकाच्या डोक्यात घुसला.
त्रिशूळाचा प्रहार इतका भयंकर होता की, यात हे अकरा महिन्यांचे बालक जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपी पल्लवी, तिचा नवरा नितीन व पल्लवीच्या दिरालाही ताब्यात घेत पुढील तपास सुरु आहे. कोणतीही चूक नसताना या अकरा महिन्यांच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.


