केज : साखर कारखान्याची ऊस तोडणीसाठी उचल घेऊन गावाकडे जात असतना मोटार सायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून रस्त्यात अडवून मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील पावणे दोन लाख रुपये घेवून पळून गेले. अशी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या युवकाच्या बोलण्यात तफावत आढळून आल्याने पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी बनावट तक्रार देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केज तालुक्यातील तरनळी येथील अंगद अनंत खेडकर हा १३ जून रोजी रात्री १०:३० वाजता केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर इसम १३ जुलै रोजी ऊसतोड मुकदमाकडून १ लाख ७५ रु. ची उचल घेऊन तो मोटार सायकलीवरून कानडी माळी मार्गे तरनळी या त्याच्या गावाकडे जात असताना रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी गावाजवळ त्याचा मोटार सायकलीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करून त्याला गावापासून दीड किमी अंतरावर निर्जनस्थळी अंधारात अडविले. त्याला दगडाने मारहाण केली आणि शखाने जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पँटच्या खिशातील १ लाख ७५ हजार रु., मोबाईल आणि मोटार सायकलची चावी घेऊन पळून गेले. मात्र चाणाक्ष असलेल्या पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी एवढे पैसे पॅन्टच्या खिशात कसे मावले? तसेच एवढी रक्कम घेऊन तो एकटाच आणि एवढ्या रात्री आडमार्गाने का जात अटसावा ? या बाबत शंका आली. तसेच एवढया रकमेच्या नोटा किती होत्या ? हे त्याला सांगता येईनासे झाले.
त्याच बरोबर पोलीस निरीक्षक उनवणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने यांनी तपास करून सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी अंगद खेडकर यांच्याशी कोणी कोणी संवाद साधला. या बाबत गुप्त माहिती घेतली. त्या नंतर पोलिसांची खात्री पटली की, तक्रारदार याचे पैसे चोरीला गेले नसून हा बनाव आहे. हे निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने अंगद खेडकर याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


