अंबड : अंबड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद देशपांडे यांना एका तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.१५) रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने अंबड शहरात एक रिकामा प्लॉट खरेदी केला असून, त्या प्लॉटची फेर नोंद व अन्य दाखले मिळवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी सहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी आज दुपारी करण्यात आली. यावेळी आरोपी अधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर तक्रारदाराला पंचासमक्ष पाठवून मत्स्योदरी देवी मंदिराजवळील सभामंडपाजवळ लाच रक्कम स्वीकारताना देशपांडे यास रंगेहाथ अटक करण्यात आली.
झडतीत आरोपीकडून लाचेच्या रकमेसह रोख ४६० रुपये आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून, त्याचे विश्लेषण करून चौकशी केली जाणार आहे. आरोपीच्या घरझडतीची कार्यवाही सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बी.एस. जाधवर यांच्यासह कर्मचारी श्रीनिवास गुडुर, गणेश चेके, शिवलिंग खुळे, बिनोरकर यांनी ही कारवाई केली.


