छत्रपती संभाजीनगर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गट, गणांचा प्रारुप आराखडा तयार केला असून तो सोमवारी (दि.१४) राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६३ गण आणि १२६ गणांचा समावेश आहे. यावेळी अंभई गट, तर धानोरा, केळगाव हे गणांची वाढ करण्यात आली आहे. या प्रारुप आराखड्यावर २१ जुलैपर्यंत हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथक नियुक्ती केले आहे.
याबाबत सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी सांगितले की, हा प्रारुप आराखडा राज्यपत्रातही प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही तो लावण्यात आला आहे. या प्रारुपाबाबत २१ जुलैपर्यंत प्रभाग रचनेसंदर्भात सूचना, हरकती नोंदविता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक पथक स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या हरकती, सूचना लेखी स्वरुपात या पथकाकडे मांडता येणार आहे. सर्व सूचना हरकती एकत्र करून त्यांची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२५ ला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.


