पिंपरी : चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसने एसटी बसला पाठीमागून धडक दिली या अपघातात खासगी बसमधील १३ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खाजगी बस देहू फाटा येथून जात होती. दरम्यान परळ डेपोच्या एसटी बसला खासगी बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात खासगी बस मधील १३ जण जखमी झाले आहेत. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच एसटी बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.


