कराड : भांडण सोडवल्याचा राग मनात धरून युवकाला फायटर आणि स्टील पाईपने मारहाण करण्यात आली. हजारमाची (ता. कराड) येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी सुरज आनंदा बागल (वय ३०, रा. हजारमाची-ओगलेवाडी) याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची ओगलेवाडी येथील सुरज बागल हा युवक सेंट्रीग काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याचा चुलतभाऊ राजेंद्र विलास बागल याचा ओगलेवाडी येथील शिवा माळी याच्याशी वाद झाला होता. त्यावेळी सुरज याने दोघांमधील भांडणे सोडवली. सोमवारी सायंकाळी सुरज हा कामावरून घरी परत जात असताना शिवा माळी याने त्याला अडवले, राजेंद्र बागल याच्याशी माझे भांडण सुरू असताना तू मध्ये का पडलास, असे म्हणून त्याने सुरजच्या तोंडावर फायटरने मारहाण केली.
त्यामध्ये सुरज जखमी झाला. त्याचवेळी शिवा माळी याच्या मित्राने स्टीलच्या पाईपने डोक्यात मारल्यामुळे सुरजच्या डोक्यात गंभीर जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. सुरज गंभीर जखमी झाल्यानंतर दोघे संशयित तेथून निघून गेले. त्यानंतर शफिक मुबारक तांबोळी यांच्यासह नागरिकांनी जखमी सुरज याला याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


