बार्शी : बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे शेतीच्या वादातून २०२० साली झालेल्या निर्दयी खुनाच्या प्रकरणात आरोपी महादेव बाजीराव मुंढे (रा. उक्कडगाव, ता. बार्शी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमआदित्य मांडे यांनी भा. दं.वि. कलम ३०२ नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
ही घटना २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.१५ च्या दरम्यान उक्कडगाव येथे घडली. फिर्यादी मृताची पत्नी असून, मृत सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय ६१) हे आरोपी महादेव बाजीराव मुंढे यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित ६ एकर शेती व त्या शेतातील विहिरीचे व बोअरचे पाणी यावरून वाद होता. या वादावरून बार्शी दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता.
या वादातून आरोपी महादेव मुंढे याने ‘जमीन न देता जिवे मारतो’ अशी धमकी दिली होती. २७ जानेवारी २०२० रोजी बाबुराव सांगळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर विजेच्या खांबाजवळ मृत सर्जेराव मुंढे यांच्यावर आरोपी महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे व बाजीराव कृष्णा मुंढे यांनी मिळून त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून ठार मारले. या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५/२०२० कलम ३०२ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिवाजी शिरसाट यांनी केला. तपासात प्रत्यक्षदर्शी व अप्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपींनीच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीत एकूण १७ साक्षीदा तपासण्यात आले. त्यात तात्याराव मुंढे, सुनील सानप (आयडिया कंपनी नोडल अधिकारी), पोलीस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख व प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. त्यांनी तपासातील पुरावे आणि साक्ष न्यायालयात प्रभावीपणे मांडले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून प्रभाकर गायकवाड व पोलीस हवालदार कुणाल पाटील यांनी जबाबदारीचे काम पार पाडले.


