पुणे : पत्रकार स्नेहा बर्वे यांच्याशी संबंधित एका धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. ४ जुलै रोजी पुण्याजवळील बेकायदेशीर बांधकामांचे वृत्तांकन करत असताना त्यांच्यावर काठीने क्रूर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
आयोगाला मिळालेल्या अहवालानुसार, हल्ल्यानंतर बर्वे बेशुद्ध पडल्या. घटनेचे गांभीर्य असूनही, मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, ज्यामुळे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे. त्यावर गंभीर चिंता व्यक्त होत आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा विजय रहाटकर यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निष्पक्ष आणि वेळेवर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य आरोपीला तत्काळ अटक करावी आणि पीडितेला योग्य वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळावा याची खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयोगाने तीन दिवसांत कारवाईचा अहवाल मागितला आहे.


