कार्ला : बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या लोणावळ्यातील बंद बंगल्यात चोरट्यांनी घुसून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद मजीद खान (५४ रा. जयसिंगपूर, संभाजीनगर) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मोहम्मद अझरुद्दीनचे पीए असून संगीता मोहम्मद अझरुद्दीन बिजलानी हिच्या मालकीच्या मावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथील गट क्रमांक ५५७ मधील बंगल्याच्या पाठीमागील बाजूने कंपाऊंडची जाळी तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून रोख रक्कम रुपये ५० हजार व हेअर कंपनीचा टीव्ही किंमत ७ हजार असा एकूण ५७हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
ही घटना ७ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. शनिवारी १९ जुलै रोजी ही फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एस. बोकड करीत आहेत.


