नवी मुंबई : तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शामिल साकिब नाचन व इरफान मुस्तफा लांडगे या दोघांनी मोक्कांतर्गत कैदेत असलेल्या गिरीश कुमारन नायर याच्यावर रंगकाम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या सहाय्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या हल्ल्यात नायर हा जखमी झाला. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शामिल व इरफान हे दोघे तसेच जखमी गिरीश नायर हे तिघेही तळोजा कारागृहातील सर्कल १ मधील वेगवेगळ्या बॅरेकमध्ये बंदिस्त आहेत. शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हे सर्व कैदी बॅरेक क्रमांक-१ मध्ये असताना, शामिल व इरफान या दोघांनी जुन्या भांडणाच्या वादातून मोक्कांतर्गत कैदेत असलेला आरोपी गिरीश नायर याच्यावर रंगकाम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या सहाय्याने हल्ला करून त्याला जखमी केले.
या हल्ल्यात गिरीश नायर हा गंभीर जखमी झाल्याने कारागृह पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर पुन्हा त्याला कारागृहात आणण्यात आल्याची माहिती तळोजा कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.


