नागपूर : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना १३ मे २०२५ रोजी विभागीय सहनिबंधकांनी जारी केलेल्या आदेशानुसार बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकपदावरून अपात्र ठरविले होते. त्यांनी या निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. हायकोर्टाने अपात्रतेच्या आदेशास स्थगिती दिली आहे. दरम्यान, न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी स्थगिती कायम ठेवत बच्चू कडूंच्या अर्जावरील सुनावणी येत्या ४ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, विभागीय उपनिबंधकांनी नोटीस बजावल्यानंतर त्यावर आक्षेप घेत अपील दाखल करण्यात आले होते. ज्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कोणताही निर्णय न घेतल्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली.
अशी नोटीस बजावणे हे एखाद्याला अपात्र सिद्ध करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. जर या नियमानुसार जबाबदारी निश्चित केली गेली, तर नियम ७३ (क, अ) नुसार याचिकाकर्त्याला अपात्र ठरविता येते. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे. सुनावणीनंतर हायकोटनि विभागीय उपनिबंधकांना त्यांच्याकडे दाखल केलेल्या प्राथमिक आक्षेपांवर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.


