पूर्णा (परभणी): रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लॉजवर गुरुवारी (दि.१७) मृतावस्थेत आढळलेल्या ४८ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याचे उघड झाले असून त्याने कोणत्या तरी अज्ञात कारणांहुन गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. याप्रकरणी होत असलेल्या हत्या की आत्महत्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पूर्णा शहरातील इंडियन लॉजच्या १०२ क्रमांकाच्या बंद खोलीत नांदेड येथील अनंत वासुदेवराव विष्णुपुरीकर (वय ४८) यांचा गुरुवारी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकारानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. मयताच्या जवळ एक सुसाईड नोट देखील सापडली असून सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची जोरदार उलट सुलट चर्चा शहरात दिवसभरात सुरू होती.
मात्र मयत विष्णुपुरीकर यांचे मामा देविदास देशपांडे (४९, रा. विद्यानगर, नांदेड) यांनी गुरुवारी रात्री उशिरा पूर्णा पोलिसांना दिलेल्या खबरीवरुन सदरील मयत अनंत विष्णुपुरीकर यांनी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. यावरुन पोलिसांनी घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जरी घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे प्रमुख कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास फौजदार प्रकाश इंगोले हे करीत आहेत.


