मालवण : महसूल विभागातील कुठलीही कामे करताना टेबलाखालून लाच दिल्याशिवाय काम होत नाही, अशी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा असते. मात्र त्यानुसार अवघ्या काही महिन्यांपूर्वीच महसूल विभागाच्या मसुरे तलाठी पदावर तलाठी निलेश किसन दुधाळ (२६) सेवेत आले अन् भ्रष्टाचाराला सुरुवात केली. शुक्रवारी जमिनीच्या वारस तपासासाठी दोन अर्जदारांकडून ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत स्वीकारत असताना आढळून आले. मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे.
याबाबत वृत्त असे की, मसुरे येथील तक्रारदार यांनी मसुरे तलाठी निलेश दुधाळ यांच्याकडे जमिनीचे वारस तपास करण्यासाठी तलाठी कार्यालयात प्रकरणे दिली होती. मात्र, सदर दोन्ही वारस तपासाचे अर्ज अनेक दिवस प्रलंबित ठेवले होते. याबाबत तलाठी यांना विचारणा केली असता प्रत्येक वारस तपास अर्जासाठी २ हजार याप्रमाणे ४ हजार रुपये लाचेची मागणी केली.


