मुंबई: मुंबईतील आकांक्षी शौचालय बांधकामात घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांची चौकशी करण्याचे आणि कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्तांची पुढील ३० दिवसांत चौकशी पूर्ण करून नियमबाह्य काम आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत १४ शौचालयांसाठी २० कोटींची निविदा मंजूर झाली असून प्रत्येक शौचालयासाठी सव्वा कोटी ते पावणेदोन कोटी रुपये खर्च होत आहेत. ही शौचालये फुटपाथांवर बांधली जात असून महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ धोरणाचा भंग होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केले. साटम यांनी या खर्चाच्या औचित्यावर प्रश्न उपस्थित करत विशेष तंत्रज्ञान आणि हितसंबंधांची चौकशी करून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याची मागणी केली.
त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ३० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन देत नियमभंग आढळल्यास कारवाई होईल, असे स्पष्ट केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी युनेस्को वारसा स्थळांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले. मुंबईच्या सौंदर्याचा आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


