पुणे : समाजमाध्यमात ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून एका महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दिले होते.
वानवडीतील फातिमानगर परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून वानवडी पोलीस ठाण्यात शिरीष जयंतीलाल गोहेल ऊर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची तक्रारदार महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, लायसन्सधारक इथिकल हॅकर असल्याचे भासवून त्याने महिलेसोबत मैत्री वाढवली. काही दिवसांनी त्याने महिलेला लग्नासाठी विचारणा केली.
या ओळखीतून त्याने वेळोवेळी आपल्या हृदय शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी, बहिणीच्या प्रसूतीसाठी आणि अन्य वैयक्तिक कारणांसाठी महिलेकडून ऑनलाईन, धनादेशद्वारे आणि रोख स्वरूपात मिळून चार लाख रुपये घेतले. याशिवाय, महिलेकडील सोन्याचे दागिने, एक सोनसाखळी आणि दोन अंगठ्या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीत गहाण ठेवून त्यावर ८० हजार रुपयांचे कर्ज काढले आणि ते स्वतःसाठी खर्च केले. अशा प्रकारे एकूण मिळून त्याने महिलेची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वानवडी पोलीस याचा तपास करीत आहेत.


