नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आगामी आशिया चषक (टी-२०) स्पर्धा आयोजित करण्यास सज्ज आहे. याबाबत काही दिवसांत औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असे आशियाई क्रिकेट परिषदेकडून (एसीसी) स्पष्ट करण्यात आले.
बीसीसीआयने याअगोदरच ऑगस्ट महिन्यातील बांगलादेशचा दौरा खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता रद्द केला आहे. त्यानंतर एसीसी बैठकीच्या ढाका येथील आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, बांगलादेशमधील अस्थिरराजकीय परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आपला प्रतिनिधी पाठवण्यास नकार दर्शवला होता. भारतासोबत श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि इतर क्रिकेट मंडळही ढाकामधील बैठकीसाठी प्रत्यक्ष सहभागासाठी उत्सुक नव्हते, आशिया चषकाच्या आयोजन स्थळावर एसीसीच्या सर्व २५ सदस्य देशांची ढाकामध्ये गुरुवारी ऑनलाईन बैठक झाली.
बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्हर्चुअल पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला. बीसीसीआय यूएईमध्ये आशिया कप आयोजित करेल, भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे. वेळापत्रकावर अजूनही चर्चा सुरू आहे, असे एसीसीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा दोन आठवड्यांपेक्षा थोडी जास्त काळ चालेल. भारत या काळात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, आशिया चषकामुळे या मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागेल. बीसीसीआयच्या दबावामुळे अजेंड्यावरील १० पैकी फक्त दोन बाबीवर चर्चा झाली.
२५ सदस्य प्रत्यक्ष, आभासी पद्धतीने बैठकीला हजर
ढाका येथे एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्ची यांनाही भारत-पाक सामन्याबद्दल विचारले असता त्यांनी मौन बाळगले. नक्वी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही लवकरच याबाबतची घोषणा करू, बीसीसीआयशी चर्चा केली आहे आणि काही मुद्दे आहेत जे आम्ही लवकरच सोडवू. सर्व २५ सदस्य बैठकीला प्रत्यक्ष किवा आभासी पद्धतीने उपस्थित होते. आम्हा सर्वांचे एकमत आहे.
बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवण्याच्या बाजूने
नियोजित वेळापत्रकानुसार २०२५ आशिया चषकाचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानने भारतामध्ये खेळण्यास नकार दर्शवला आहे. त्यावर तोडगा म्हणून यूएईत स्पर्धा खेळवण्याचा पर्याय खुला होता आणि बीसीसीआय ही त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवण्याच्या बाजूने आहे.


