छत्रपती संभाजीनगर : राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारेल, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत २०२१ मध्ये महाड येथे केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्याविरूद्ध राज्यात चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. संबंधित गुन्हे रद्दसाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी प्रतिवादींना नोटीस बजावत सुनावणी १९ ऑगस्टला ठेवली आहे.
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना राणे यांनी २३ ऑगस्ट २०२१ मध्ये महाड येथे पत्रकार परिषदेत टीका केली होती. ठाकरे यांच्याविषयी बोलतना त्यांनी कानामागे मारेल असे वक्तव्य केले होते. यावरून राणे यांच्या विरोधात राज्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जळगाव, अहिल्यानगर, धुळे आदींसह मुंबई येथे गुन्हे दाखल झाले होते. मुंबई उच्च न्यायालयातील एक गुन्हा औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला होता. धुळे शहर पोलिस ठाण्यात जयश्री सुनील महाजन, कोतवाली पोलिस ठाणे अहिल्यानगर येथे बाळासाहेब बोऱ्हाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राणे यांनी समाजात द्वेषभावना निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले होते. आपल्यावरील गुन्हा रद्दसाठी राणे यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. राणे यांच्यावतीने अॅड. अनिकेत निकम, अॅड. राहुल तांबे, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे (मुंबई) यांनी बाजू मांडली तर शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.


