नवी मुंबई: महापे उड्डाणपुलाखाली वाहतूक नियमनासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या पोलीस हवालदार गणेश पाटील यांना क्रेनची धडक लागून झालेल्या अपघातात पाटील हे क्रेनच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर महापे वाहतूक पोलिसांनी क्रेन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस हवालदार गणेश पाटील हे महापे वाहतूक शाखेत कार्यरत होते. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते महापे वाहतूक शाखेसमोरील चौकात वाहतूक नियमनासाठी उभे होते. यावेळी रबाळे एमआयडीसी येथून तुर्भेच्या दिशेने जाणाऱ्या क्रेन चालकाने निष्काळजीपणे क्रेन चालविली. त्यामुळे रस्त्यालगत वाहतूक नियमनासाठी उभ्या असलेल्या हवालदार गणेश पाटील यांना क्रेनची धडक लागली. त्यामुळे ते काही समजण्याच्या आत क्रेनच्या चाकाखाली आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी जखमी गणेश पाटील यांना तत्काळ वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघातानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी क्रेनचालक राजेश गौड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार गणेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


