रत्नागिरी : राज्यातील कोकण किनारपट्टीवर पुढील दोन ते तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर ओसरला असून कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत, तर मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात पावसाच्या मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दोन ते तीन दिवस कोकण-गोव्यात बहुतांश भागांत, विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.


