ST Bus Brand Ambassador: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाने (MSRTC) आता कात टाकण्याचे ठरवले आहे. एसटीची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आणि तरुण पिढीला सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
पुढील ५ वर्षांसाठी ‘देशमुख’ जोडीवर जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढील दोन दिवसांत या स्टार जोडीसोबत अधिकृत करार करणार आहेत. हा करार पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. याअंतर्गत रितेश आणि जिनिलिया एसटीच्या विविध जाहिराती, प्रवासी जनजागृती मोहिमा आणि सोशल मीडिया प्रमोशन्समध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील. ग्रामीण भागासोबतच शहरी प्रवाशांमध्ये ‘लालपरी’ची क्रेझ वाढवण्याचा महामंडळाचा हा मुख्य उद्देश आहे.
परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेची जोड
एसटी महामंडळाने यापूर्वीही दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून आपली ओळख जपली आहे. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम पाहिले आहे. आता रितेश-जिनिलिया या लोकप्रिय जोडीच्या निमित्ताने महामंडळ एका नव्या आणि आधुनिक ब्रँडिंगकडे वळत आहे.
देशमुख कुटुंबासाठी दुहेरी आनंद: धाकटा राहिलही करणार सिनेसृष्टीत पदार्पण
ब्रँड अॅम्बेसिडरच्या बातमीसोबतच देशमुख कुटुंबासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रितेश देशमुख यांच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून, जिनिलिया महाराणी सईबाईंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही रितेश स्वतः करत असून, आता राहिलच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


