Youth Suicide : बुलढाणा जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावात घडली. २८ वर्षीय हरीश वानखेडे हा अनेक वर्षांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याचे लग्न जुळत नव्हते. याच नैराश्यातून त्याने घरातच गळफास घेत आयुष्य संपवले. कुटुंबीय कामावरून परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. हरीश हा भूमिहीन आणि गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरी घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. २५ वर्षीय सत्यपाल भिसे यानेही लग्न जुळत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. नोकरी न मिळणे आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे तो मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याला व्यसन लागले आणि अखेर त्याने झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.
दोन्ही घटनांमुळे स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अशा घटना समाजासाठी गंभीर इशारा आहेत. मानसिक तणाव, एकटेपणा किंवा नैराश्य वाटत असल्यास जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे किंवा तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे.


