BJP Leader : भंडाऱ्यातील गाजलेल्या प्रकरणात माजी आमदार आणि भाजप नेते डॉ. अविनाश वारजूकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या वाहन चालक आशिष नागदेवे यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. हा निकाल १७ एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी दिला.
२०१५ मध्ये एका महिलेने वारजूकर यांच्यावर बलात्कार आणि धमकावल्याचा आरोप करत भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, ९ नोव्हेंबर २०१५ रोजी शहरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता.
मात्र, न्यायालयात सादर झालेल्या पुरावे आणि साक्षींच्या आधारे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या साक्षीनुसार संबंधित महिला आणि तिचा मित्र कैलास गोलछा हे त्या दिवशी एकाच खोलीत थांबले होते आणि त्यांनी मद्यपान केल्याचेही स्पष्ट झाले.
तपासादरम्यान सादर झालेल्या साक्षी आणि पुराव्यांमध्ये विसंगती आढळून आल्याने न्यायालयाने तक्रारीतील आरोप विश्वसनीय नसल्याचे नमूद केले. त्यामुळे डॉ. अविनाश वारजूकर आणि आशिष नागदेवे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
या निर्णयानंतर वारजूकर यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून “सत्याचा विजय झाला” अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.


