नवी दिल्ली: या वर्षी भारतातील साखर उत्पादनात घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये संपणाऱ्या चालू हंगामात आतापर्यंत २५.८ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे ११८.३८ टक्के कमी आहे. ऊसाची उपलब्धता नसणे, खराव हवामान, इथेनॉल उत्पादनात वाढ तसेच कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे साखर उत्पादनात घट झाल्याचे नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने म्हटले आहे.
साखरेचे एकूण उत्पादन २६.११ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या ३१.९ दशलक्ष टनापेक्षा हे खूपच कमी आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये विशेष गाळपाचे काम सुरू आहे. यामुळे एकूण उत्पादनात काही टनांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कर्नाटकात गेल्या वर्षीच्या एका गिरणीच्या तुलनेत यावर्षी सात गिरण्या सुरू आहेत. त्याच वेळी गेल्या वर्षीच्या ११ गिरण्यांच्या तुलनेत यावर्षी नऊ गिरण्या सुरू असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.
सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशातील उत्पादन जुलैपर्यंत ९.२७ दशलक्ष टनांपर्यंत घसरले. गेल्या वर्षी याच महिन्यात हे प्रमाण १०.३६ दशलक्ष टन होते. दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या उत्पादक महाराष्ट्रात उत्पादनात मोठी घट झाली आणि ते ११ दशलक्ष वरून ८.०९ दशलक्ष टनांपर्यंत घसरले. तर, कर्नाटकातील उत्पादन ५.१६ दशलक्ष टनांवरून ४.०६ दशलक्ष टनांपर्यंत घसरले. साखर कारखान्यांमधील साखरेचे दर प्रति क्विंटल ३,९०० रुपयांच्या आसपास राहिले होते; परंतु मे महिन्याच्या मध्यापासून त्यात घसरण होत आहे. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे किमती स्थिर राहण्याची अपेक्षा असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.


