महाराष्ट्र जागरण डेस्क: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांची ऑनलाईन सुरक्षा लक्षात घेऊन युट्युब एक मोठा बदल करणार आहे. होय, युट्युब येत्या काही दिवसांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने युजर्सचे नेमके वय शोधून काढणार आहे. अकाऊंट तयार करताना युजरने चुकीच्या वयात प्रवेश केल्यास या नव्या सिस्टीममुळे त्याच्या वास्तविक वयाचा अंदाज बांधता येणार आहे. एका रिपोर्टनुसार, ही नवी सेवा अमेरिकेत 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे. यानंतर हळूहळू हे फीचर उर्वरित जगात लागू करण्यात येणार आहे.
मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेची मागणी सुरू
खरं तर जगभरातील सरकारे मुलांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन सुरक्षेकडे प्रथम लक्ष देण्याची मागणी टेक कंपन्यांना करत आहेत. अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि युरोपियन युनियनमधील अनेक देशांनी हे नवे नियम यापूर्वीच लागू केले आहेत, ज्याअंतर्गत कंपन्यांना युजर्सच्या वयाची पडताळणी करावी लागेल आणि अल्पवयीन मुलांना अयोग्य कंटेंटपासून वाचवावे लागेल.
यूट्यूबची एआय सिस्टीम शोधणार वय
यूट्यूबची एआय सिस्टीम युजर दिवसभरात काय सर्च करतो, कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि यामुळे युजरचे वय कळेल. जर एखादा युजर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा आढळला तर प्लॅटफॉर्म त्या अकाऊंटवर अनेक निर्बंध लादू शकतो. यात प्रौढ किंवा अयोग्य सामग्रीपासून दूर राहण्याचे मार्ग देखील समाविष्ट असतील.
युट्युब पाठवणार नोटिफिकेशन
१८ वर्षांखालील युजर्स जास्त वेळ स्क्रीनवर राहू नयेत यासाठी युट्युब वेळोवेळी ‘टेक अ ब्रेक’सारखे नोटिफिकेशनही पाठवणार आहे. यासोबतच बॉडी इमेज असलेल्या संवेदनशील विषयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. युजरने एखादा फोटो किंवा कमेंट पोस्ट केल्यावर यूट्यूब प्रायव्हसी रिमाइंडरदेखील दाखवेल.


