सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार १९७८ मध्ये पाडले, पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्रीपदाचा मान दिला आणि ‘महाराष्ट्राचे भवितव्य घडवण्याची ताकद शरद पवारांमध्येच आहे’ असा आशीर्वादही दिला. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी या ऐतिहासिक क्षणाची आठवण सांगितली. ते म्हणाले या सभेचा मी स्वतः साक्षीदार होतो.
शरद पवार यांनी नुकतेच आपण वसंतदादांचे सरकार पाडले, परंतु त्यानंतर दादांनीच आपल्याला मुख्यमंत्रीपद दिल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, “राजकारणात त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. शरद पवारांनी त्या काळात राजकीय गरजेनुसार ते पाऊल उचलले होते.”
१९८८ मध्ये अमराई येथे झालेल्या प्रचंड मोठ्या मेळाव्यात वसंतदादांनी शरद पवारांना पाठिंबा देताना जाहीरपणे सांगितले, “इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा, ते महाराष्ट्राचे भविष्य घडवतील.” या सभेत शहाजीबापू स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी वसंतदादांचे हे भाषण ऐकले होते.
शहाजीबापूंनी पुढे सांगितले की, वसंतदादांनी केवळ मुख्यमंत्रीपदच दिले नाही, तर शेवटपर्यंत शरद पवारांना त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा कायम होता. राजकारणात घडामोडी घडत असतात, आणि त्या काळात घडलेल्या घटना त्याच परिस्थितीचा भाग होत्या.
शरद पवारांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना संधी देऊन त्यांचे नेतृत्व घडवले. (स्व.) आर. आर. पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी मोठे केले. शहाजीबापूंनी लक्ष्मण ढोबळे यांचे उदाहरण देत सांगितले, “ढोबळे पंढरपूर महाविद्यालयात प्राध्यापक होते. शरद पवारांनी त्यांना एका क्षणात उमेदवारी दिली आणि कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचवले. पवारांनी अनेकांना उभे केले आणि त्यांचे नेतृत्व वाढवले, असं शहाजी बापू म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील किंगमेकर्स
शहाजीबापूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात माणसे घडवण्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांना ‘किमयागार’ संबोधताना ते म्हणाले, “पानटपरीवरचा माणूसही बाळासाहेबांनी उभा केला. त्यांच्या भडक भाषेतील आशीर्वाद प्रचंड ऊर्जा देत असे.” नारायण राणे, मनोहर जोशी आणि आजच्या एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादातूनच उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले.


