पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्याने ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आक्रमक झाले असून, त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. बारामतीतूनच मराठा आंदोलनाला रसद पुरवली गेल्याचा आरोप करत हाके यांनी थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मात्र, बारामती पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही, “अटक करा, तुरुंगात टाका, पण बारामतीत जाणारच,” असे म्हणत हाके आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी सरकारने जारी केलेल्या शासकीय आदेशावर (GR) तीव्र आक्षेप घेतले. ते म्हणाले, “आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. पण सरकारचा हा GR केवळ ओबीसीच नव्हे, तर SC आणि ST यांचेही आरक्षण धोक्यात आणत आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, तुम्हाला आम्ही मत दिले नाही का? मराठा आंदोलनाला बारामतीतून रसद पुरवली गेली. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, आणि त्यासाठी बारामतीत मोर्चा काढणारच.”
हाके यांनी पवार कुटुंबावर “पावर ईस्ट इंडिया कंपनी” अशी टीका करत, “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता” हे तत्त्व जपल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. आरक्षण गेले तर गावातील बलुतेदार काय करणार? आम्ही न्यायासाठी बारामतीत रॅली काढणार. मुंबईपेक्षा बारामतीचा गणपती मोठा नाही!”
पोलिसांनी परवानगी का नाकारली?
बारामती पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे कारण देत मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी आंदोलकांना पुढील तारीख घेण्याची विनंती केली होती, परंतु हाके आणि त्यांचे समर्थक आजच (5 सप्टेंबर 2025) मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. हाके यांनी पोलिसांच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत म्हटले, “पोलिस असे का वागत आहेत? आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. जरांगे यांना मुंबईत परवानगी मिळते, मग आम्हाला का नाकारली?”


