पुणे: बारामती तालुक्यातील पारवडी (इंगळे वस्ती) येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणात 25 वर्षीय सौरभ विष्णू इंगळे याची काका आणि चुलत भावाने मारहाण करून हत्या केली. ही घटना बुधवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आणि त्याचा चुलत भाऊ प्रमोद यांच्यात जुन्या वादावरून वाद सुरू झाला.
दरम्यान, प्रमोदचे वडील रामदास इंगळे यांनी सौरभला धरून ठेवत प्रमोदला ‘जाऊ देऊ नको, मारून टाक’ असे सांगितले. प्रमोदने तत्काळ धारदार शस्त्राने सौरभच्या मानेवर वार केला. गंभीर जखमी झालेला सौरभ रुग्णालयात दाखल करण्यात आला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपास सुरू –
या घटनेबाबत मृताची आई सुनीता विष्णू इंगळे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपी जगन्नाथ इंगळे आणि त्याचा मुलगा प्रमोद रामदास इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे, वादानंतर आरोपी वडील-मुलगा स्वतःच बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. मात्र त्याचवेळी पोलिसांना सौरभचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपींना अटक केली.


