मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेच. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गरोदरपणाच्या चर्चांना आता अधिक वाव मिळाला आहे. सुरुवातीला कतरिना सैल कपड्यांमध्ये दिसल्याने या अफवांना सुरुवात झाली होती. याआधीही ‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचदरम्यान अशाच चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यावेळी विकीने त्या अफवा नाकारल्या होत्या. त्याने सांगितले होते की, जेव्हा खरी आनंदाची बातमी असेल, तेव्हा आम्ही ती चाहत्यांसोबत नक्की शेअर करू.
याचदरम्यान, एका रेडिट पोस्टमध्ये विकी-कतरिनाच्या फोटोसोबत बाळाच्या पावलांचे ठसे शेअर करण्यात आले होते. यात 2025 मध्ये दोघे पालक होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, ती पोस्ट चाहत्यांनी तयार केलेली असल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, आता मात्र एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने कतरिनाच्या गरोदरपणाची पुष्टी केली आहे. सूत्रानुसार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे. तरीही विकी-कतरिनाने या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, बाळाच्या जन्मानंतर कतरिना दीर्घ प्रसूती सुट्टी घेणार आहे, कारण तिला मातृत्वाचा काळ पूर्णपणे अनुभवायचा आहे. दरम्यान, विकी कौशलसाठी हे वर्ष करिअरच्या दृष्टीनेही यशस्वी ठरले आहे. त्याचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तो सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत लव्ह अँड वॉरच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर कतरिना शेवटची विजय सेतुपतीसोबत मेरी क्रिसमस या चित्रपटात दिसली होती.


