नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी सुधारणांच्या घोषणा केली. याचा आता मोठा परिणाम दिसून येत आहे. प्रसिद्ध मदर डेअरीने मंगळवारी दुधाच्या किमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच कंपनीने त्यांच्या पॅकेज केलेल्या दुधाच्या किमती प्रति लिटर २ रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. यासह इतर कंपन्यांही आपल्या दुधाच्या दरात कपात केली आहे.
मदर डेअरीने त्यांच्या १ लिटर टोन्ड टेट्रा पॅक दुधाची किंमत ७७ रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत कमी केली आहे. याशिवाय तूप-पनीरसह इतर वस्तूंच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत. कंपनीने दुधाच्या किमती कमी केल्यानंतर १ लिटर यूएचटी दुधाची (टोन्ड-टेट्रा पॅक) किंमत ७७ रुपयांवरून ७५ रुपयांवर आली आहे, तर ४५० मिली पॅक आता ३३ रुपयांऐवजी ३२ रुपयांना उपलब्ध होईल. याशिवाय, कंपनीच्या सर्व फ्लेवर्सच्या मिल्कशेकच्या १८० मिली पॅकची किंमत ३० रुपयांवरून २८ रुपयांवर आली आहे.
चीजच्या किमतीत २०० ग्रॅम चीजचे पॅकेट आता ९५ रुपयांऐवजी ९२ रुपयांना उपलब्ध होईल. याशिवाय, ४०० ग्रॅम चीजचे पॅकेट आता १८० रुपयांऐवजी १७४ रुपयांना उपलब्ध होईल. मलाई पनीरच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत आणि २०० ग्रॅम पॅक १०० रुपयांवरून ९७ रुपयांवर आला आहे.
तूपाच्या दरातही केली घट
मदर डेअरीने किमतीत कपात केल्यानंतर, आता ग्राहकांना या कंपनीचे बटर आणि तूप देखील स्वस्त दरात मिळणार आहे. ५०० ग्रॅम बटरची किंमत ३०५ रुपयांऐवजी २८५ रुपये असेल, तर १०० ग्रॅम बटर टिक्कीची किंमत ६२ रुपयांऐवजी ५८ रुपये असेल. तुपाच्या किमतीत झालेल्या कपातीकडे पाहिल्यास, १ लिटर कार्टन पॅकची किंमत ६७५ रुपयांवरून ६४५ रुपये झाली आहे.


