पुणे : पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. आयुष कोमकर याच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर नसून, त्याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (वय ३६) असल्याचा धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
आयुषच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल कृष्णानेच मारेकऱ्यांना पुरवल्याची कबुली अन्य आरोपी अमन पठाण आणि सुजल मेरगू यांनी दिली आहे. नाना पेठेतील या खळबळजनक खुनाच्या कटात कृष्णा हाच मुख्य दुवा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर खून आणि मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल आहे. फरार झालेला कृष्णा, बंडूच्या ‘एन्काउंटर’च्या दाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस तपासात कृष्णानेच पिस्तूल पुरवल्याचे उघड झाले असून, हे शस्त्र त्याला नेमके कोठून मिळाले, फरारीदरम्यान तो कोणाच्या संपर्कात होता आणि पुरावे नष्ट केले का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गुन्हे शाखेने कृष्णाला अटक करून विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले. सहायक आयुक्त शंकर खटके आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी सांगितले की, “हा खून मालमत्ता आणि पैशांच्या वादातून झाला. कृष्णानेच पिस्तूल पुरवले असून, तो मारेकरी आणि कट रचणाऱ्यांमधील मुख्य आरोपी आहे.
” याउलट, कृष्णाच्या वतीने अॅड. मनोज माने, अॅड. मिथुन चव्हाण आणि अॅड. प्रशांत पवार यांनी बचाव मांडला की, “पिस्तूल आधीच जप्त झाले आहे. कृष्णा स्वतःहून हजर झाला आणि तपासास सहकार्य करत आहे.” दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने कृष्णाला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी कृष्णाकडे त्याचा मोबाइल मागितला असता, त्याने तो फोडून फेकल्याचे सांगितले. तसेच, मकोकाची नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. आता पोलिस सर्व आरोपींची वैयक्तिक आणि सामूहिक चौकशी करणार असून, खुनामागील खरा मास्टरमाइंड आणि कटाचा पूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे.


