Ayush Komkar Case: पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात फरार आरोपी मुनाफ पठाणला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपासात उघड झाले की आयुषच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल मुनाफ पठाणने पुरवले होते. त्यामुळे त्याचा या खून प्रकरणात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात आले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पठाण हा कुख्यात शूटर कृष्णा आंदेकरचा जवळचा साथीदार मानला जातो. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातही त्याने सहभाग घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंदेकर 16 सप्टेंबर रोजी समर्थ पोलिसांसमोर हजर झाला.
हेही वाचा – मोठी बातमी! आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी आतापर्यंत बंडू आंदेकर टोळीतील बारा जणांना अटक करण्यात आली होती. कृष्णा आंदेकर 11 दिवस फरार होता, मात्र शेवटी तो शरण आला. पोलिसांच्या कडेकोट कारवाईमुळे आंदेकर टोळीचे सर्व प्रमुख चेहरे आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. आयुष कोमकरचा खून 5 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता.
दरम्यान, ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लासवरून परतताना घराच्या पार्किंगमध्ये आयुषवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे असून मुनाफ पठाणची अटक ही तपासातील महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.


