Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध गुरुवारी झालेल्या कारवाईत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. एटापल्ली तहसीलच्या जंगलात सी60 कमांडोंसोबत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादींना ठार करण्यात आलं. या महिला नक्षलवाद्यांवर एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
मृत महिलांमध्ये सुमित्रा उर्फ सुनीता वेलाडी हिचा समावेश असून तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते. दुसरी महिला म्हणजे ललित उर्फ लड्डो, गट्टा दलाची एसीएम, जी कांकेर जिल्ह्यातील रहिवासी होती. तिच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एके-47 रायफल, पिस्तूल, 37 जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत सीआरपीएफ आणि पाच सी60 पथकांचा सहभाग होता. दोन्ही बाजूंनी जवळपास एक तास चकमक सुरू राहिली. नंतर घटनास्थळावर शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह काल हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आणि तेथे त्यांची ओळख पटवण्यात आली. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सातत्याने कार्यरत असून ही कारवाई त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.


