नवी दिल्ली : जर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), युनिफाईड पेन्शन योजना (UPS), अटल पेन्शन योजना (APY) आणि NPS Lite शी देखील संबंधित असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, यासंबंधी नवीन नियम बदलणार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीज (CRAs) द्वारे आकारण्यात येणाऱ्या शुल्कात सुधारणा केली आहे.
जून २०२० मध्ये लागू केलेल्या शुल्क रचनेऐवजी ही नवीन शुल्क रचना १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल. या बदलाचा लाखो पेन्शनधारकांवर परिणाम होईल. नवीन PRAN उघडताना सरकारी कर्मचाऱ्यांना आता e-PRAN किटसाठी ₹१८ आणि भौतिक PRAN कार्डसाठी ₹४० द्यावे लागतील. प्रति खाते वार्षिक देखभाल शुल्क ₹१०० असेल. शून्य शिल्लक असलेल्या खात्यांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर सरकारी कर्मचाऱ्यांना PRAN उघडण्यासाठी ₹१५ आणि वार्षिक देखभालीसाठी ₹१५ द्यावे लागतील. व्यवहार शुल्क ₹० असेल.
अटल पेन्शन योजना (APY) सदस्य आणि NPS-Lite साठी शुल्क रचना सोपी करण्यात आली आहे. आता, या खात्यांसाठी PRAN उघडण्याचे शुल्क आणि वार्षिक देखभाल शुल्क प्रत्येकी ₹१५ असेल, तर व्यवहार शुल्क ₹० असेल. या कमी पेन्शन शुल्काचा उद्देश अधिक लोकांना पेन्शनशी जोडणे आहे.


