मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या चर्चेत आहे. तिने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या ती ‘राईज अँड फॉल’ हा रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. स्पर्धक तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत नवीन माहिती उघड करताना दिसत आहे.
अनायाने शोमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्स देखील शेअर केली आहेत. अनायाने खुलासा केला आहे की, तिला वयाच्या आठव्या वर्षापासून तिची खरी ओळख समजली होती आणि तिला नेहमीच महिलांचे कपडे घालायचे होते. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेपूर्वी अनायाचे नाव आर्यन होते. तिच्या वडिलांनी तिला स्पष्टपणे सांगितले की, क्रिकेटमध्ये तिच्यासाठी कोणतेही स्थान नाही. ज्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास झाला आणि तिने आत्महत्या करण्याचा विचारही केला होता.
अनायाने तिला झालेल्या लिंग छळाबद्दल क्रिकेट क्षेत्रातील काही व्यक्तींबाबत उघडपणे सांगितले. क्रिकेट जगतात तिला अनेक वेळा याचा सामना करावा लागला आहे. लिंग बदलल्यानंतरही तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
संमतीशिवाय पाठवले अश्लील फोटो
काही क्रिकेटपटूंनी तिच्या संमतीशिवाय तिचे अश्लील फोटो पाठवले, अपमानास्पद टिप्पणी केली आणि तिला अयोग्य वागणूक दिली. भारतीय क्रिकेटमधील पुरुषी मानसिकतेमुळे महिला आणि ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी मर्यादित जागा आहे. अन्याय्य वागणूक मिळण्याची भीती असल्याने अनायाने अनेकदा आपली ओळख लपवली.


