MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणार आहे. महामंडळाने 8,000 नवीन एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी 17,450 चालक आणि सहाय्यकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार आहे. ही भरती मोहीम 2 ऑक्टोबर 2025 पासून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू होईल. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भरती झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान 30,000 रुपयांचे मानधन मिळणार आहे.
महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती केली जाणार असून, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. भरती महाराष्ट्रातील सहा प्रादेशिक विभागांमध्ये करण्यात येईल. सरनाईक यांनी म्हटलं की, नव्या बसेस आणि वाढीव मनुष्यबळामुळे प्रवाशांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होईल.
यापूर्वी राज्य सरकारने पोलिस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रक्रिया लांबल्याने उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता एमएसआरटीसी भरतीमुळे तरुणाईला रोजगाराची नवी संधी मिळणार आहे.


